प्रकाशन हिरेमठ संस्थान ट्रस्ट महाराष्ट्र बसव परिषद भालकी.
लेखक राजु जुबरे.
संकलन हणमंत शिवणप्पा शंके आलुर 9370433030
शरणांची लाडकी लेक : विरवैरागीणी अक्कमहादेवी.
बसवण्णांची घरची मुलगी झाल्याने भक्तिप्रसाद त्यांनी दिला.
चेन्नबसवण्णांच्या सेवकाची मुलगी झाल्याने शेषप्रसाद त्यांनी दिला.
प्रभुदेवांच्या सेवकाच्या सेवकाच्या बालसेवकाची मुलगी झाल्याने ज्ञानप्रसाद त्यांनी दिला.
सिद्धरामय्यांची शिशुकन्या झाल्याने प्राणप्रसाद त्यांनी दिला.
मडिवाळय्यांची घरची मुलगी झाल्याने निर्मलप्रसाद त्यांनी दिला.
अशा असंख्य शिवशरणांनी आपल्या करुणेच्या बाळाला
जवळ घेतल्याने चेन्नमल्लिकार्जुनाच्या श्रीचरणासाठी योग्य झाले.
जगज्योती महात्मा बसवण्णांनी आपल्या समग्र क्रांतिकार्याचे अर्धांग स्त्री शक्तीस मानले. शतकानुशतके स्त्रीस माया, राक्षसी, शूद्र, परमार्थातील धोंड, विटाळ, अपवित्र व पापिणी अशी दूषणे दिली जात होती. ती नष्ट करून ‘स्त्री प्रत्यक्ष महादेवी’ म्हणून तिचा गौरव केला. रूढी-परंपरांच्या बुरख्याआड लपलेला तिचा चेहरा मुक्त करून तिची अस्मिता जागविली. तत्कालीन समाजव्यवस्थेतील स्त्रियांवरील सर्व अनिष्ट बंधने झुगारून दिली आणि स्त्री-पुरुष समतेचा उद्घोष केला. महात्मा बसवण्णांच्या या उदात्त विचारांनी अनुभव मंटपरूपी नभांगणात अनेक स्त्री-नक्षत्रे लखलखली. या नक्षत्रांच्या समूहातील एक देदिप्यमान तारा म्हणजे वीर वैराग्यनिधी अक्कमहादेवी होय.
अक्कमहादेवी म्हणजे अध्यात्मसाधनेतील उत्तुंग गौरीशंकर शिखर ! शिवयोगिनी ! मधुराभक्ती मयूरी! शिवप्रिया! वचन उद्यानातील कोकिळा !
चेन्नमल्लिकार्जुनाची प्रियतमा ! विश्वचैतन्याची सखी! असंख्यात शरणांची कारुण्य-शिशू! बसवण्णांचे चित्त सुखावेल असे नांदून शरण परिवाराच्या माथी कीर्तिसुमने आणणारी लाडकी कन्या!!
अक्कमहादेवीचा जन्म ११४६ साली कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील उडुगणी (उडुतडी) येथे झाला. उडुगणी निसर्गसौंदर्याने फुललेला भूभाग होय. निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेले सौंदर्य सुमती आणि निर्मलशेट्टी यांच्या पोटी महादेवीच्या रूपाने व्यक्तिरूपात प्रकटले. महादेवीच्या जन्माने चैत्र पौर्णिमेचा चंद्रही प्रसन्नपणे हसला आणि सुमती व निर्मलशेट्टी यांच्या आनंदाला उधाण आले. शिवभक्तिसंपन्न असलेल्या या दांपत्याने त्या परमात्म्याचे कृतार्थपणे स्मरण करत अतिशय प्रेमाने महादेवीचे संगोपन केले. महादेवी दिननित्य पूजा, अर्चना, जप, चिंतन यातच आपला वेळ घालवत असे. गावाशेजारील गुरुलिंगदेवांच्या मठात तिचे येणे-जाणे असे. अनुभव मंटपातील वचन-शिदोरी घेऊन जंगम प्रचारक गुरुलिंगदेवांच्या मठात येत असत. त्या वचनांचा अभ्यास, चिंतन व पठण करण्याचा ध्यास महादेवीस होता. बसवादी शरणांची वचने तिच्या कविहृदयाला साद घालत होती. वचनांच्या चिंतन-मंथनाने महादेवीच्या प्रतिभेलाही पंख फुटले. बालवयापासूनच अध्यात्माचे विशेष आकर्षण असलेल्या महादेवीने गुरुलिंगदेवांकडून इष्टलिंग दीक्षा घेऊन ‘शरणसती-लिंगपती’ या शरण सिद्धान्ताप्रमाणे जीवन जगण्याचा मनाशी निश्चय केला. शरणांच्या वचनांत तिला स्त्री-स्वातंत्र्याचा हुंकार जाणवला. समतेचा निनाद ऐकू आला. अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध लढण्याचे बळ तिला मिळाले. जगरहाटी नाकारून नव्या वाटा निर्माण करण्याची स्फूर्ती मिळत गेली. वचनांतील उदात्त विचारांनी महादेवी बसवादी शरणांच्या चळवळीकडे आकर्षित झाली आणि तिच्या जीवनाला एक नवे वळण मिळत गेले.
अक्कमहादेवीचे जीवन म्हणजे वैराग्य, त्याग, प्रतिभा, निष्ठा, प्रीती, भक्ती आदी गुणांचा समुच्चय झाला. अक्काच्या सद्गुणी व्यक्तित्वास अप्रतिम सौंदर्याची लाभलेली किनार तिच्या जीवनसंघर्षाची गाथा झाली.
अक्कमहादेवीच्या सौंदर्यावर मोहित झालेला कौशिक राजा तिच्याशी विवाह करण्याचा हट्ट धरतो. तेव्हा अक्कमहादेवी मोठ्या धैर्याने राजाज्ञेस नकार देते. कामांध झालेला राजा महादेवीच्या प्राप्तीसाठी तिच्या आई-वडिलांना त्रास द्यायला सुरू करतो. ही गोष्ट महादेवीच्या लक्षात आल्यानंतर ती काही अटी घालून राजा कौशिकशी विवाह करण्यास संमती दर्शविते. महादेवीने घातलेल्या तीन अटी अशा –
१. देहावर बळजोरी करणार नाही.
२. इष्टलिंगपूजा साधनेत व्यत्यय आणणार नाही.
३. राजाने भक्तिसाधनेकडे वळावे.
या तीन अटींपैकी कोणतीही अट भंग झाल्यास तत्क्षणी मी राजवाड्याबाहेर पडेन, असा इशारा देऊन महादेवी राजवाड्यात प्रवेशते. विषयासक्त झालेला राजा कौशिक जास्त दिवस संयम बाळगू शकत नाही. मान्य केलेल्या अटी तो विसरतो. महादेवीच्या सौंदर्य अभिलाषेने तिचा पदर धरण्याचा प्रयत्न करतो. महादेवी त्याचक्षणी दिगंबरा होऊन राजवाड्यातून बाहेर पडते. महादेवीला दिगंबरा अवस्थेत पाहून राजा शरमतो. अक्काच्या दिगंबरत्वाबद्दल संशोधकांनी विविध मते व्यक्त केली आहेत. डॉ. एच. देवीराजा म्हणतात, –
‘भारतातील धार्मिक क्षेत्रात दिगंबरत्व हा सर्वसंगपरित्यागाचा सांकेतिक अर्थ आहे.’ परंतु अक्काच्या अनेक वचनांतून तिच्या दिगंबर अवस्थेला पुष्टी मिळते.
हातातील धनसंपदा हरण करता येईल;
मनातील भावसंपदा कशी हिरावून घेता येईल?
परिधान केलेले वस्त्राभरण हिसकावून घेता येईल;
तिरोहित निर्वाण कसे बळकावता येईल?
चेन्नमल्लिकार्जुनदेवाचे दिव्यांबर धारण करून लज्जातीत झालेली मी वेषभूषेची पर्वा का करू?
अशा तन्हेने अक्कमहादेवी दिगंबरा होऊन बाहेर पडते आणि कल्याण बसवकल्याण) च्या दिशेने ती निघते.
( उडुगणी ते कल्याणपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. लोकनिंदा, अपमान, तहान, भूक, निवारा, थंडी व उष्णता हे सर्व सोसत अक्कमहादेवी अतिशय धैर्याने चालत राहते. अक्काचे मनोबल किती सामर्थ्यशाली आहे याचे प्रतिबिंब तिच्या एका वचनात उमटले आहे. या वचनात तिने केलेल्या खडतर प्रवासाचीही कल्पना आपल्याला येते.
भूक लागली तर गावात भिक्षान्न असे.
तहान लागली तर नदी-तलाव असती.
झोपण्यासाठी पडकी देवालये असती.
थंडी झोंबता टाकून दिलेली वस्त्रे असती. चेन्नमल्लिकार्जुना, माझ्या जोडीला तू आत्मसांगाती असशी.
राजवैभव लाथाडून एकाकी होऊन आपल्या ध्येयप्राप्तीसाठी लढणारी अक्का असामान्य धैर्यशालिनी होय. गावागावात भिक्षा मागत, नदी-तलावातील पाण्याने तृष्णा भागवून, संध्याकाळी पडक्या देवालयाचा आसरा घेत केलेला प्रवास अतिशय कष्टप्रद, जीवघेणा आणि असह्यकारी होता. परंतु याची तमा न बाळगता अक्का कल्याणच्या अनुभव मंटपात सामील होऊन शरण परंपरेचा पाईक होण्यासाठी कुठल्याही परिस्थितीशी सामना करायला ती तयार होती. तिच्या निश्चयाचे बळ फळस्वरूप झाले आणि अक्का कल्याण नगरीत प्रवेशली. बहुत दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बसवादी शरणांचे वासस्थान असलेले कल्याण पाहून अक्का त्या पवित्र भूमीस मनोमन वंदन करते आणि म्हणते, –
जाता येई का कोणासही कल्याणा ?
नच जावे, असाध्य ते जाणा.
आशा, आमिष नष्ट झाल्याशिवाय कल्याणमध्ये ठेवू नये हो पाय.
अंतर्बाह्य शुद्धीविना जाऊ नये कल्याणा.
मी-तू भेद निःशेष केल्याविन, कल्याण रहस्य न घ्यावे उमजून. चेन्नमल्लिकार्जुनाशी जोडुनी प्रीती मी उभय लाज सांडिली म्हणुनी नमो नमो म्हणते कल्याण पाहुनी.
अक्कमहादेवी कल्याणमध्ये आल्याचे वृत्त कळताच शरण समुदायात आनंदी-आनंद पसरतो. अनेक दिवसांपासून जिची कीर्ती ऐकून कान तृप्त झाले होते, त्या अक्कमहादेवीच्या साक्षात दर्शनाने ह्या नेत्रांचे पारणे फिटतील, अंग लिंगसंगी होईल, म्हणून अक्काच्या स्वागतासाठी सर्व जण सज्ज झाले असता, प्रभुदेवांनी सर्वांना दिननित्य कायकास जाण्यास सांगितले. सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. परंतु प्रभुदेवांचा यामागे काहीतरी हेतू आहे हे ओळखून सर्व जण परतले. प्रभुदेवांनी किन्नरी बोम्मय्याला पाठवून अक्काची परीक्षा घेण्यास सांगितले. किन्नरी बोम्मय्या अक्काच्या वैराग्याची परीक्षा घेतो, तेव्हा अक्का त्यालाच मार्मिक उपदेश करत आपला मार्ग सांगते. शेवटी किन्नरी बोम्मय्या अक्कमहादेवीस शरण जातो. ‘किन्नरी बोम्मय्या असे मज भाऊ’ म्हणून अक्का त्यास शरणार्थी करते. किन्नरी बोम्मय्या आणि अक्कमहादेवी अनुभव मंटपात प्रवेशतात. अक्का अतिशय नम्रपणे शरणांच्या मांदियाळीस हात जोडून शरणु शरणार्थी करते. तेव्हा अल्लमप्रभू अक्कास प्रश्न करतात, –
तू इथे का आलीस हे सती? तू असशी नवयुवती,
सती म्हटल्यास आमचे शरण रुसती.
सांग तव पतीचे नाव, बैस मग येऊनी.
हे ताई, ना तरी जाई परतुनी.
आमुच्या गुहेश्वरलिंगाच्या शरणाठायी अपेक्षिल्यास तयांचे संगसुख, सान्निध्य,
सांग हे माते, कोण असे तव भ्रतार ?
अल्लमप्रभूच्या या प्रश्नास अक्का मोठ्या धैर्याने उत्तर देते, ते असे, –
लिंगमुखी अंग अर्जुनी, अंग अनंग जाहले.
ज्ञानाशी मन अर्जुनी, मन हे लय पावले.
तृप्तीसी भाव अर्जुनी, भाव शून्य जाहले.
निःशेष झाल्याने अंग-मन-भाव
शरीर अकाय जाहले.
मम कायेचे सुखभोग, भोगितसे लिंग, मग, शरणसती-लिंगपती बनले. अन् याचिकारणे, पती चेन्नमल्लिकार्जुनाच्या अंतरी लीन होऊनी समरसले.
अक्कमहादेवीच्या या उत्तराने अल्लमप्रभूचे समाधान झाले नाही. प्रभुदेव पुन्हा प्रश्न करतात, – ‘अंग-मन-भाव निःशेष झाल्यावर, कायेचे सुख लिंगपतीच भोगत असताना, तू कामाला जिंकले असता, हे शरीर केशसंभाराने का झाकले आहेस?’ तेव्हा महादेवी उत्तर देते,-
सालीचा रंग न बदले फळ पिकल्याविना, बघुनी काममुद्रा होतील तुम्हा वेदना;
या भावे झाकले मम शरीर.
बांधवांनो, छळू नका मज,
चेन्नमल्लिकार्जुन देवाच्या अधीन झाले मी.
अल्लमप्रभूच्या अशा प्रखर प्रश्नांना अक्कमहादेवीने अतिशय शांतपणे आणि संयमाने उत्तरे दिलेली पाहून शरण समुदाय थक्क झाला. प्रभुदेवांच्या प्रश्नाग्नीने अक्काच्या वैराग्याचे तेज अधिकच झळाळले. महादेवी शरणांच्या मांदियाळीची अक्का (थोरली बहीण) झाली. अक्कनागम्मा आणि नीलांबिकेने ‘ये, मुली’ म्हणून तिला हृदयाशी कवटाळले. अल्लमप्रभू, बसवण्णा, चेन्नबसवण्णा, सिद्धराम व इतर अनेक शरणांनी अक्कमहादेवीस प्रणाम करून तिच्या वैराग्याचा, भक्तीचा गौरव केला. महात्मा बसवण्णा अक्काचा गौरव करताना म्हणतात, –
प्रभुदेव, अक्कमहादेवीचे दिव्य वैभवसंपन्न स्वरूप पहा. विसरुनी कायेची लज्जा, त्यजिला प्राणांचा मोह. दग्ध करुनी मनाची स्मृती, लौकिक व्यवहार त्यागिले.
कूडलसंगमदेवा, ऐशी अक्कमहादेवी जननी माझी !
अल्लमप्रभू, ‘गुहेश्वरलिंगाठायी जाहली भेदभावरहित हो, त्या अक्क-महादेवीच्या श्रीचरणी नमो नमो’ असे म्हणून अक्काची स्तुती करतात. ‘लहान-मोठा भेद विसरुनी कूडलचेन्नसंगय्यात समरस झालेली महादेवीअक्का सर्वांत महान आहे.’ असे चेन्नबसवण्णा म्हणतात. ‘कपिलसिद्ध मल्लिकार्जुनातील अक्क-महादेवीला शरण गेल्याने मी शुद्ध झालो पहा…’ असे शिवयोगी सिद्धराम म्हणतात.
अक्का आपल्या असंख्य वचनांतून धर्मपिता बसवण्णा, अल्लमप्रभू, चेन्नबसवण्णा, माचिदेव, सिद्धराम, अजगण्णा आदी शरणांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करते. अक्काची दृष्टी शिवमय झाली होती. यास तिचे खालील बचनच साक्ष देते.
बसवण्णा गुरू, प्रभुदेव लिंग, सिद्धराम जंगम, मडिवाळ असे पिता, चेन्नबसवण्णा माझे दैवत; आणखी सुखी झाले मी पहा, चेन्नमल्लिकार्जुना.
महात्मा बसवण्णांच्या दयेने अक्कमहादेवीस काय साध्य झाले हे तिच्या
वचनातूनच पहा.
कामांतकासी जिंकिले बसवा, तव कारणे.
शशिधरासी वश केले बसवा, तव कृपेने.
संबोधन नारी ऐसे, म्हणून काय जाहले ?
भावात असे नररूप, बसवा, तव दयेने.
अतिकामी चेन्नमल्लिकार्जुनासी
आव्हान देऊन, द्वैत विसरून समरसले बसवा, तव कृपेने.
अक्काने आपल्या अनेक वचनांतून बसवण्णांचा अतिशय आदरपूर्वक उल्लेख करून त्यांच्याठायी असलेली निष्ठा समर्पित केली आहे. अक्का शरण परिवाराचा गौरव करते. अनेक शरण अक्काची महान वैराग्यवृत्ती पाहून मुक्तपणे स्तुतिसुमने उधळतात. विशेष म्हणजे बसवण्णा अक्कमहादेवीस जननी म्हणतात. अक्का बसवण्णांना जन्मदाता पिता म्हणते. शरण साहित्यातील ही समत्वदृष्टी जगातील अन्य साहित्यात विरळच जाणवते. पंढरीच्या वाळवंटात एकत्र आलेला वारकरी अभिमान सांडून ‘एकमेकां लागती पायी रे’ म्हणून नतमस्तक होतात. हा भक्तिसुखाचा सोहळा १००-१२५ वर्षे अगोदर कल्याणच्या अनुभव मंटपात साजरा झाला हे विशेष होय.
अक्कमहादेवी अनुभव मंटपातील दिव्यरत्न होऊन झळाळली. भक्ती, ज्ञान व वैराग्याच्या तेजाने तिचे जीवन उजळले. शरणांच्या सहवासात अक्काचे तेजोवलय भूमंडलास व्यापले. शिवयोग साधनेतून लिंगांग सामरस्य साध्य झाले. अनुभव मंटपातील चर्चा तिची वैचारिक परिपक्वता अधिक दृढ करत होती.
कल्याण तिचे माहेर झाले. शरणांची मांदियाळी तिचा परिवार झाला. सर्वांची ही लाडकी मुलगी बसव महामनेच्या अंगणात बागडताना म्हणते, –
बागडावे, गावे, सांगावे, ऐकावे, चालावे, बोलावे, शरणांच्या सवे-सुखद सहवासात रमून जावे. हे चेन्नमल्लिकार्जुनदेवा, तू दिल्या आयुष्याचे दिन उर्वरित कंठेन मी लिंगसुखींच्या संगतीत.
अक्कमहादेवी वचन उद्यानातील भावमधुर कोकिळा ! कन्नड साहित्यविश्वात प्रप्रथम स्त्री-शक्तीचा आविष्कार तिच्या वचनांतून घडून आला. आध्यात्मिक प्रेमाची अभिव्यक्ती, भावगीतांचे सौंदर्य, मधुरता, काव्यात्मकता, अंतरात्म्याचे संगीत, उत्कटता, विरह-मिलनाचे सुख अशा अनुभवाचे मर्मज्ञ वर्णन तिने वचनांमधून केले आहे. प्रेमातील अनुबंध शब्दांत व्यक्त करण्याचे तिचे सामर्थ्य वाखाणण्याजोगे आहे. वचनांत उपयोजिलेल्या उपमा, दृष्टांत व अलंकार इ. हे साहित्य-सौंदर्याची साक्ष देतात. अध्यात्मअंगाने बहरत जाणारी अक्काची साहित्यवेल समाजाभिमुख होऊन गगनावर गेली आहे. भक्ती आणि प्रीतीची अप्रतिम भाषा अभिव्यक्त करणारी तिची प्रतिमा तेवढ्याच समर्थपणे समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातिभेद, लिंगभेद, विषमता, वेदप्रामाण्य आदी विषयांवर कठोर प्रहार करते. म्हणूनच चेन्नबसवण्णा अक्काच्या वचनरचनेची महती सांगतात, –
आद्य शरणांच्या साठ वचनांना बसवण्णांची वीस वचने, बसवण्णांच्या वीस वचनांना प्रभुदेवांची दहा वचने, प्रभुदेवांच्या दहा वचनांना अजगण्णांची पाच वचने, अजगण्णांच्या पाच वचनांना कूडलचेन्नसंगय्यातील
अक्कमहादेवीचे एकच वचन सम होई पहा.
अक्काची वचनरचना वचनसाहित्य दालनातील स्वयंप्रकाशाने तळपणारे रत्न आहे. त्या रत्नप्रभेत मानवी जीवनाचे साफल्य साठले आहे. अक्काची वचन-तुतारी पुरुषप्रधानता नाकारून स्त्री-पुरुष समतेचे रणशिंग फुंकणारी आहे. अक्काची वचने भक्तीने ओथंबलेली असली तरी, त्यात विद्रोहाचा हुंकार आहे. बसवपूर्व काळातील सर्व धर्मप्रणीत ग्रंथ व इतर साहित्यात स्त्री ही पुरुषास माया होऊन सतावत असते असे वारंवार सांगितले आहे. या व्यवस्थेला अक्का आपल्या वचनांतून प्रतिकार करते. पुरुषास ज्याप्रमाणे स्त्री माया आहे, त्याचप्रमाणे पुरुषही स्त्रीस माया आहे है
अक्का मोठ्या धैर्याने सांगते, –
पुरुषाच्या समोर माया स्त्रीरूपी अभिमान होऊन सतावते.
स्त्रीच्यासमोर माया पुरुषरूपी अभिमान होऊन सतावते,
लोकरूपी मायेला शरणचारित्र्य वेडाचार भासे.
चेन्नमल्लिकार्जुनाच्या कृपापात्र शरणाला
माया नाही, विस्मरण नाही, अभिमान नाही.
पुरुषाला त्रास देणारी माया ही स्त्री नसून स्त्रीरूपात भासणारा त्याचाच अभिमान आहे. स्त्रीला त्रास देणारी माया ही सुद्धा पुरुषरूपात भासणारा तिचा अभिमानच आहे, असा स्पष्ट निर्वाळा देत अक्कमहादेवीने इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेला पहिला हादरा दिला आहे.
स्त्री ही असमर्थ, कमकुवत, अबला नाही, तर तीही धैर्यशील, पराक्रमी, सामर्थ्यशाली आहे. चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री उंबरठ्याबाहेर आल्यावर हाती खड्ग धरून दुष्टांचे निर्दाळण करू शकते, असा आशावाद व्यक्त करताना अक्का म्हणते, –
शूरपणाच्या गोष्टी केल्यास,
मी केव्हाचीच सज्ज वीरवेषात.
सुगंध लेपून, लावून टिळा भाळावर,
शस्त्र परजवीत रणी उतरल्यावर,
बांधलेल्या निऱ्या सुटल्या तर –
तुमची आण पहा, चेन्नमल्लिकार्जुना.
स्त्री शक्तीची अस्मिता जागवून तिच्या धैर्याचे, सामर्थ्याचे दर्शन या वचनातून
घडते.
अक्कमहादेवी सामान्य जीवाला आयुष्याची सार्थकता कशात आहे, याचे प्रतिपादन करते. नसती उठाठेव करण्यात आयुष्य सरत जाते. जीवनाचे ध्येय दुरावते. म्हणून अक्का म्हणते, –
आयुष्य सरते आहे, भविष्य दुरावते आहे,
जमलेले सती-सुत जाती, आपापल्या वाटेने.
व्यर्थ संसारात निष्फळ होऊन नाश पावू नको रे मना.
चेन्नमल्लिकार्जुनाच्या शरणांच्या सत्संगात निश्चयपूर्वक जगावे सफल जीवन, रे मना !
आयुष्य क्षणभंगुर आहे. जीवनाच्या प्रवासात विशिष्ट थांब्यावर सती, सुत, आप्तजन, इष्टमित्र भेटतात आणि त्यांचा कार्यभाग साधला म्हणजे ते निघून जातात. म्हणून अशाश्वत अशा स्वकियांसाठी जीवन व्यर्थ न घालवता शरणांच्या सत्संगात निश्चयपूर्वक जग. खऱ्या जीवनाचे साफल्य शरणांच्या संगात आहे. लिंगांग सामरस्य जाणून घेऊन त्यात ऐक्य व्हावे. अंग लिंगरूपात विलीन करणेच जीवनाचे ध्येय आहे, असे अक्का म्हणते.
आपण जीवन जगत असताना सुख-दुःख, आशा-निराशा, निंदा-स्तुती, चढ-उतार येतच असतात. जीवन हेच एक युद्ध आहे. पावलोपावली संघर्ष करावा लागतो. जीवनातील संकटांना समर्थपणे सामोरे गेले पाहिजे, असा आशादायी दृष्टिकोन अक्का आपल्या वचनातून स्पष्ट करते. या संदर्भात अक्काचे एक वचन अत्यंत बोलके आहे.
घर केले जर गिरीवरती, बाळगावी का पशुंची भीती?
घर केले जर सागरतटी, बाळगावी का लाटांची भीती ?
घर केले जर भर मंडईत, कोलाहलाने का व्हावे लज्जित ?
ऐक बा चेन्नमल्लिकार्जुना,
जन्मल्यावरी या जगती, येता जरी निंदा नि स्तुती, मनी न होता कोपायमान, चित्ती असो द्यावे समाधान.
या वचनात अक्काने योजिलेल्या उपमा अत्यंत समर्पक आहेत. मानवी स्वभाव हा स्तुतीने आनंद पावतो, तर निंदेने दुःखी होतो. सुख आले म्हणजे नाचतो, बागडतो. दुःख आल्यावर निराश होऊन जातो. क्षणाक्षणाला त्याची चित्तवृत्ती बदलत असते. वास्तवात सुख-दुःख, निंदा-स्तुती यांचा प्रत्येकाच्या जीवनात पाठशिवणीचा खेळ चालू असतो. रात्रीनंतर दिवस त्याप्रमाणे सुखानंतर दुःख, स्तुतीनंतर निंदा येत असते. अशा वेळी अनेकांना जीवनसंघर्ष करणे कठीण होऊन जाते आणि ते स्वतःला संपवण्याकडे झुकतात. म्हणूनच अक्का स्तुती-निंदा यांच्या पार जाऊन चित्तवृत्ती समस्थितीत ठेवायला सांगते. सार्थक जीवन जगण्याची कला अक्का आपल्या वचनातून अगदी सहजपणे अनेक उदाहरणे देऊन पटवून देते.
अक्काची वचनरचना विविध अंगांनी बहरलेली आहे. अक्काच्या वचनाचे साहित्यिक मूल्य अजोड आहे. अक्काची वचने तिच्या आत्मचरित्राची व व्यक्तित्वाची जिवंत आणि ज्वलंत अभिव्यक्तीच आहेत. म्हणूनच वचनसाहित्य विश्वातील तीं कोहिनूर होत. त्यांस मधुराभक्तीचे कोंदण लाभून ती अधिकच अमूल्य झाली आहेत. अशी ४३४ समृद्ध वचने आजपर्यंत उपलब्ध झाली आहेत. कर्नाटक सरकारने प्रकाशित केलेल्या समग्र वचन संपुट ५ मध्ये ही वचने समाविष्ट केली आहेत. अक्कमहादेवीने आपल्या वचनाच्या शेवटी ‘चेन्नमल्लिकार्जुन’ असे अंकित वापरले आहे. (चेन्नमल्लिकार्जुन म्हणजे, मरणाविना, आकाराविना, आदिअंताविना, रूप-गुण-नामाविना, भव-भयाविना, निस्सीम असलेला परमात्मा होय. तोच इष्टलिंगरूपात इवलासा होऊन करस्थळी विराजमान झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.)
अक्काची वचनसाहित्य संपदा, याशिवाय, योगांग त्रिविधी, स्वरवचन व सृष्टिवचन ह्यासुद्धा महत्त्वपूर्ण रचना समजल्या जातात.
अक्कमहादेवी शरण परिवारातील लाडकी लेक होऊन, सर्वांची अक्का होऊन आपल्या वैराग्य व भक्तीने सर्वांच्या प्रेमादरास पात्र झाली. आपल्या लाडक्या मुलीप्रमाणे सर्वांनी तिच्यावर प्रेम केले. तिच्या सहवासातील प्रत्येक क्षण शरणांना दैवीमय, आनंदमय वाटत असे. बसवण्णा, प्रभुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली अक्का अध्यात्मसाधनेत उन्नत अवस्थेला पोहचली होती. पती चेन्नमल्लिकार्जुनाच्या भेटीची ओढ अपूर्व अशीच होती. त्या ओढीनेच अक्का श्रीशैलच्या कदळीबनाकडे निघाली. शरण संकुलात अनुपम सुखात राहणारी अक्का निर्वाणीच्या प्रवासाला निघते. सर्व शरण समुदाय साश्रू नयनांनी अक्कास निरोप देण्यासाठी येतो, तेव्हा अक्का म्हणते, –
जन्मले श्रीगुरुहस्तामाजी, वाढले असंख्यातांच्या कारुण्याने, भावचि दूध, सुज्ञानचि तूप, परमार्थरूपी साखर मज वाढली, ऐसे त्रिविधामृत तृप्त होईपर्यंत वाढून मज पोषियले.
केला विवाह माझा, अनुपम वर पाहून,
जा मुली जा, तू दिल्या घरी जा म्हणून
मज निरोप देण्या आलात तुम्ही शरण असंख्यात.
संसार ऐसा मांडीन, सुखावेल बसवण्णांचे चित्त.
चेन्नमल्लिकार्जुनाचा धरुनी हात,
आणीन तुमच्या माथी सुमने, न आणीन तृण;
ऐका ठेवुनी चित्त, जावे आता आपण परत,
असो आपल्या चरणी माझे शिवशरणार्थ.
अक्काच्या या भावपूर्ण निरोपाने शरणांच्या अश्रूचा बांध फुटला. सर्वांनी सद्गदित अंतःकरणाने अक्काचा जयजयकार केला. ‘शरणु शरणार्थी’ हे शब्द लोप पावत गेले आणि अक्का शरणांच्या दृष्टिआड झाली.
कल्याण ते कदळीचा (श्रीशैल) अक्काचा प्रवास म्हणजे एका आनंदयात्रीचा प्रवास होय. जीव-शिव ऐक्याचा प्रवास होय. भवसागर पार केलेल्या वीर वैराग्यनिधीची पाऊले काळाच्या उदरावर आपल्या अथांग कर्तृत्वाचे ठसे उमटवत धीरगंभीरपणे चालत होती. अंग-लिंग यातील द्वैत नष्ट होऊन अद्वैताची प्रभा सर्वत्र फाकत होती. चराचरात समत्वदृष्टी व्यापली होती. या दृष्टिसंयोगाने कदळीवनातील पशू, पक्षी, हिंस्र श्वापदे यांच्यातील वैरत्वभावही निमाला. अक्का चराचरात चेन्नमल्लिकार्जुनाचे दर्शन करत कदळीवनात येते. अक्काची चित्तवृत्ती स्थिरावते. अक्का कदळीच्या घनदाट वनातील गुफेत इष्टलिंग करस्थळी घेऊन दृष्टी अनिमिष करते. भाव निर्भाव होतो. शब्द निःशब्द होतात. निःशब्दतेतील अनुभाव म्हणजेच लिंगांग सामरस्य होय.
लिंग न म्हणे, लिंगैक्य न म्हणे,
संग न म्हणे, समरस न म्हणे,
‘झाले’ न म्हणे, ‘नाही होणार’ न म्हणे,
‘तू’ न म्हणे, ‘मी’ न म्हणे.
चेन्नमल्लिकार्जुना,
लिंगैक्य झाल्यानंतर काहीच न म्हणे.
अक्कमहादेवी लिंगात समरसली. शून्य शून्यात मिळाले. इ. स. ११६८ ला वैराग्याचा तेजोगोल श्रीशैलच्या कदळीवनात मावळला. शरणांच्या मांदियाळीतील शक्तिपर्व अस्तंगत झाले.
शरणु शरणार्थी..
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


