नागपूर : मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज (गुरुवार, ५ जून) रोजी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेटमधील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा मोठा सोहळा पार पडला. लोकार्पणाआधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपूर – मुंबई प्रवास १६ तासांऐवजी आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गिकेचं लोकार्पण केलं. या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुकर होणार आहे. एमएसआरडीसीने ५५ हजार कोटी रुपये खर्च करून हा ७०१ किमी लांबीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी शीघ्रगती महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले आहे.
असा आहे महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प
७०१ किमी लांबीचा मार्ग
५५,३३५ कोटी रुपयांचा खर्च
उड्डाणपूल, डोंगर-दऱ्यांमधील व्हायाडक्ट याची संख्या – ७३
वन्यजीवांच्या संचारासाठी या मार्गावर १०० प्रकारच्या संरचना उभारण्यात आल्या आहेत. यात ८ ओव्हरपास व ९२ अंडरपास तयार करण्यात आले आहेत.
या महामार्गावर ३२ मुख्य पूल आणि ३१७ लहान पूल उभारण्यात आले आहेत.
मार्गावर ५९ ओव्हरपास आणि २२९ अंडरपास आहेत.
देशातला आत्तापर्यंतचा सर्वात रुंद बोगदा इगतपुरी येथे तयार करण्यात आला आहे.
पादचाऱ्यांसाठी १८० ओव्हरपास, २२४ अंडरपास तयार करण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीसाठी इंटरचेंज आहेत.
११ डिसेंबर २०२२ रोजी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण
२६ मे २०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण
३ मार्च २०२४ रोजी तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण
५ जून २०२५ रोजी चौथ्या टप्प्याचं लोकार्पण
शेवटचा टप्पा ७६ किमीचा आहे. यात एकूण ५ जुळे बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी ११ किमी इतकी आहे. यामध्ये अग्निशमन यंत्रणा देखील आहे. बोगद्यातील तापमान ६० अंशांपर्यंत गेल्यानंतर आपोआप पाण्याची फवारणी सुरू होईल. तापमान ३० पेक्षा कमी झाल्यावर पाण्याची फवारणी आपोआप बंद होईल. १०० टक्के अग्निविरोधी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. अपघातावेळी बचाव कारण्यासाठी जोडबोगदे तयार करण्यात आले आहेत.