जटाजूटीं गंगा व्याघ्र-चर्मधारी ॥ त्याची सेवा बरी वाटे जीवा ॥ १ ॥
वामांगी पार्वती अंगाशी विभूती ॥ तेथें माझी मति बैसलीसे ॥ २ ॥
तया वीण दुजें नये माझें मना ॥ चातकाशीं जाणा मेघ जैसा ॥ ३ ॥
मत्स्यालागी जैसे जळीं जीवपण ॥ तयातें सांडून वांचे केवीं ॥ ४ ॥
तैसें आम्हां आहे सांडीता ही सोय ॥ बहु बोलू काय वाचें आता ॥ ५ ॥
जन्मताचें पूर्वी शिवार्पण पिंड ॥ वृत्ती ही अखंड झाली असे ॥ ६ ॥
मन्मथ म्हणे ऐसा नेम ॥ अंतरिचा प्रेम सदाशिव ॥ ७ ॥
अर्थ
हा अभंग भगवान शंकरांवरील अढळ भक्ती आणि समर्पण व्यक्त करतो. मन्मथ माऊली सांगतात की, गंगेला जटेत धारण करणारे, व्याघ्रचर्म परिधान करणारे आणि अंगभर विभूती लावलेले भगवान शंकर तसेच त्यांच्या डाव्या बाजूस असलेली पार्वती यांच्यावर माझे मन पूर्णपणे स्थिर झाले आहे. शंकरा शिवाय मला दुसरे काहीही नको, जसा चातक पक्षी फक्त ढगांचीच वाट पाहतो किंवा जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तशीच माझी अवस्था झाली आहे. माझे संपूर्ण जीवन जन्मापासूनच शिवाला अर्पण झाले असून माझी वृत्ती अखंडपणे शिवभक्तीत रमली आहे. म्हणूनच माझ्या अंतःकरणात सदैव सदाशिवा विषयी प्रेम आहे.


